खताचा खांब

स्वैपाकघरातला दैनंदिन ओला कचरा बाकीच्या कचर्‍यापासून बाजूला ठेवावा, त्याचे खत करावे, अशी बरीच दिवस इच्छा होती. पण नेमके कसे सुरू करावे हे कळत नव्हते. जो तो मला इथल्या दमट हवेमुळे कचर्‍याभवती डास-चिलटं आणि वासाच्या त्रासाबद्दल भीती घातल होता. फार किचकट नसणारा साधा डबा बाल्कनीच्या एका कोपर्‍यात मला ठेवायचा होता. कचर्‍याला हवा लागली पाहिजे पण चिलटं लागायला नकोत, खत जमा व्हायला आणि ओलसर कचरा गळायाला खाली चांगली जागा पाहिजे, अशा सगळ्या अडचणी होत्या. पण आमच्या घराजवळच कचर्‍याचा ढीग जमतो, आणि प्लास्टिकच्या पिशवींमध्ये सगळ्यांनी मिसळून टाकलेला ओला-सुका कचरा संध्याकाळ पर्यंत कावळ्यांमुळे रस्ता भर पसरतो. बघवत नाही. त्यामुळे आपल्यापुरतं तरी काहीतरी केलंच पाहिजे असा निर्धार केला.

बंगलोर-स्थित “डेली डंप” या संस्थेकडून छोट्याशा बाल्कनीत खताची व्यवस्था कशी करता येईल या बद्दल चांगली माहिती मिळाली. ते या साठी सुंदर मातीचे घडे देखील विकतात. पण कलकत्त्याला ती पाठवणं त्यांना शक्य आणि परवडण्यासारखं नव्हतं. मी त्यांना फोन केल्यावर “तिथल्याच एका कुंभाराशी बोलून असेच काहीतरी करून घ्या” असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांनी द्यायला आणि मला ते अंमलात आणायला एक वर्ष लागलं, पण शेवटी जमलं, हे महत्त्वाचं. डेलीडंपवाल्यांच्याच एका मॉडेलवरून मी एकाच आकाराच्या तीन मोठी मातीच्या कुंड्या निवडल्या.

फुलांच्या नक्षीकामामुळे त्यांच्या बाजूला हवी तशी छिद्रं होतीच. माशांचा त्रास चर झालाच तर आतून मच्छरदाणीचं कापड फाडून छिद्रांवर चिकटवण्याचा बेत आहे. त्यातील दोन कुंड्यांच्या बुडाला मी कुंभाराकडून थोडे मोठे भोक कापून घेतले. मग त्यावर एक जाळी घातली. सर्वात खालची, तिसरी कुंडी तशीच, पाण्यासाठी अगदी छोटेसे भोक असलेली.

जाळीच्या दोन्ही कुंड्या या तिसर्‍या कुंडीवर रचल्या. बेत असा: पहिल्या, सर्वात वरच्या कुंडीत रोजचा कचरा टाकायचा. ती भरली, की मधली, दुसरी कुंडी वर आणून, ही भरलेली मधल्या ठिकाणी ठेवायची. दुसरी भरेपर्यंत पहिलीतला कचरा कुजून मातीसारखा झाला असावा; पुन्हा हिला वर ठेवायची वेळ आली, की ही माती-खत सर्वात खालच्या कुंडीत ओतून टाकायचे. आता पुन्हा ही कुंडी भरेपर्यंत दुसरी, वरून उतरविलेली मध्यभागी ठेवायची. असेच या दोन्ही कुंड्यांना आदलून-बदलून वर-मधे ठेवायचे, आणि खालच्या कुंडीत माती-खत साठवायचे. ती देखील भरली, की बाल्कनीतल्या इतर फुल-पालांच्या कुंड्यात घालायचे!

एक रुटीन बसायला किती दिवस लागतात बघू. पण आज पहिल्यांदा सालं-बिलं वरच्या कुंडीत टाकल्यावर खूप मजा आली. सध्या तरी दोनच झाडं आहेत – एक तुळशीचं, आणि एक कडिपत्त्याचं. मागे कोथिंबीर छान आली होती, आणि आता मिर्चीचे देखील लावायचे आहे. हा उपक्रम यशस्वी झाला तर अजून कुंड्या आणता येतील. पण कडिपत्त्याचं रोप लहान कुंडीतून मोठ्यात यशस्वी रित्या लावता आलं, याने चांगलाच हुरूप आलाय. मला फुलझाडांचं तेवढं आकर्षण नाही, पण एक मोगरा आणि गुलाब लावता आले तरी पुष्कळ होईल!

Advertisements
Posted in Uncategorized | 6 Comments

विश्राम बेडेकरः “रणांगण”

काही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. “प्रसिद्ध”, “सनसनाटी”, “मैलाचा दगड” “आक्षेपार्ह” वगैरे त्यांना लावलेले लेबल्स आत्मसात करतो आणि चर्चेत अनेकदा माना डोलावतो. पण असले एखादे प्रसिद्ध आणि बहुचर्चित पुस्तक एकदाचे वाचण्यात आले, की त्याबद्दल नवीन काय आणि कसे म्हणायचे, हा प्रश्न उठतो. “हे तुला आत्ता कळलं? पुस्तकाला येऊन प वर्षं झाली की, ही चर्चा आता जुनी झाली!” हे ऐकावे लागते. पण आमची परिस्थिती थोडीफार सिनेमातल्या पोलीसांसारखी असते – मोक्याच्या ठिकाणी पोहोचायला हमखास उशीर. साहित्यिक मैलाच्या दगडांपर्यंतही धापा टाकत उशीराच पोहोचतो, आणि कसेबसे आपले मत सगळ्यांना सांगू लागतो.

विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी वाचून माझे असेच काहीतरी झाले. बेडेकरांबद्दल तपशीलवार असे काहीच वाचले नव्हते, पण त्यांच्याबद्दल, आणि कादंबरीबद्दल तुटक-तुटक बरेच काही ऐकले-वाचले होते. अलिकडेच रणांगण वाचून काढली, आणि भयानक आवडली. पुस्तकाने खूप अस्वस्थ ही केले, आणि त्याच्या भोवती इतकी चर्चा झाली याचे नवल वाटत नाही.

कांदंबरीचा काळ १९३० च्या दशकाचा, दुसर्‍या महायुद्धाचे वारे लागलेल्या दिवसांचा आहे. इंग्लंडहून परत मुंबईकडे येताना, जहाजावर कथानायक चक्रधर हॅर्टा नामक जर्मन ज्यू महिलेला भेटतो, आणि तिच्या प्रेमात पडतो. कथानक बहुतांश बोटीवरच उलगडते. बोटीवर विविध देशाचे, धर्माचे, वंशाचे लोक असतात, त्यातील मोजक्याच तिघा-चौघांना आपण भेटतो. त्यांचे परस्पर संबंध जुळत, मोडत जातात. कादंबरी जागा, काळ आणि पात्रांनी अगदी सीमित असली तरी बेडेकर विश्वाचे एक लघु रूप तयार करून जीवन, अस्मिता आणि मानवी संबंधांबद्दल व्यापक प्रश्न उभे करतात.

कादंबरीचा आशय राष्ट्रीयत्व, आणि राष्ट्रीय अस्मितेची चिकीत्सा आहे. प्रत्येक पाउलावर या अस्मितेची ओढ आणि तिचे पोकळपण हे दोन्ही बेडेकर उभे करतात. कथेचा काळ राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा कळस होता, तरी त्या भाववेचा उद्रेक म्हणावा अशा महायुद्धाच्या मुळाशी देखील व्यापार आणि लोभच आहे, आणि तोही तिसर्‍याच देशाच्या (अमेरिकेच्या) लोकांचा, हे आपण वाचतो. चक्रधर भारतीय/मराठी आहे, पण त्याचा देश ब्रिटिश साम्राज्यात सामिल आहे – जागतिक पातळीवर स्वतंत्र असे अस्थित्व त्याला नाही. बोटीवर विविध जातीजमातीचे लोक आहेत – ब्राह्मण, मराठा, मुसलमान, उत्तरेकडील मंडळी. बोटीवरच्या भारतीयांच्या अगदी मोजक्या, नेमक्या संवादातून बोत मुंबईच्या दिशेने चालली असली तरी “घरी मायदेशी” परत जाणे तितके सरळसोपे नाही हेही कळते. आपल्या देशावर ब्रिटिशांचाच नाही, तर मुसलमानांचा किती हक्क आहे, यावर सर्वांचे एकमत नाही. पॅलेस्टाइनच्या अगदी जवळ जाऊनही तिला पुण्यभूमी मानणार्‍या यहूद्यांना तिथे उतरता येत नाही. ज्यू प्रवासी स्वत:ला जर्मनच मानतात, पण तेथून त्यांची क्रूर हकालपट्टी झालेली असते. (पुढे ह्याच हकालपट्टीमुळे ते गॅस चेंबरातल्या सामुहिक कत्तलेतून वाचतात, हे भीषण सत्य कादंबरी लिहीताना बेडेकरांना अर्थात माहित नव्हते) यातले काही नाइलाजाने इँग्रजी हीच जगाची भाषा म्हणून तिला केविलवाणी पद्धतीने शरण जातात. (इंग्रजीला शरणागति देखील पुढे जागतिकीकरण आणि प्रगतीच्या नावाने अनेकांच्या नशिबी येईल हे देखील त्यांना ठाउक नव्हतेच!) भारतीय आणि पाश्चात्य जगात आणि विचारांमध्ये मनमुराद वावरणारा चक्रधर ऐन वेळी त्या cosmopolitan जगात शिरून हॅर्टाला आपले करू शकत नाही. किती नाही म्हटले तरी त्याला “घरी” यावेच लागते, तो तिने त्याला दिलेल्या नावासारखे पुर्णपणे “बॉब” होऊ शकत नाही.

राष्ट्रीयत्वाच्या उदाहरणावरून एकूण माणसाच्या भावनांच्या सत्यतेचे स्वरूप कादंबरी शोधत जाते. दुसर्‍या व्यक्तीप्रती प्रेमभावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकर विसंगत आणि अतिरेकी रूपात सादर करतात; एकीकडे प्रेम आणि सहानुभूति यांना काही राष्ट्रीय सीमा नाही हे वेगवेगळ्या संबंधातून आपण पाहतो – चक्रधर आणि हॅर्टाचे प्रेम, मन्नान या पात्राशी हॅर्टाचा संबंध, डॉ शिंदे यांना लुई या लहान मुलाचा लळा, इत्यादी. तरी हे सगळं इतकं सोपं देखील नाहीये, कदाचित अशक्यच आहे, असा निराशाजनक सूरही आहे. जागतिक युद्धासारखेच हे वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? कादंबरी कमालीचा संयम पाळून आपल्याला सरळ उत्तर देत नाही. हॅर्टा आत्मजत्या करते, पण तिच्या आणि चक्रधरच्या प्रेमाला बेडेकर खोटे ठरवत नाहीत. मला शेवटी काय होणार हे आधीच माहित असूनही फार वाईट वाटले.

रणांगणातला व्यक्तींचा सामाजिक चौकटींविरुद्ध संघर्ष वाचला की समकालीन ई. एम. फॉर्स्टर चे “Howard’s End” आणि “A Passage to India” कादंबर्‍या आठवल्यावाचून राहिले नाही. दोन्ही कादंबर्‍यांमध्ये वेगवेगळ्या वर्ग/जमातींमधले संबंध बनत राहतात (“always connect!”) पण शेवटी निराशाच हाती लागते (“not here, not now”).

राष्ट्रीय भावना ही एकतेचे गुणगान करत असली तरी मुळात ती कृत्रिम आणि विभाजनवादी, विध्वंसक आहे, हा तर्क दुसर्‍या युद्धानंतर जगात अनेकांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडला. युरोपातच नाही तर भारतीय उपखंडात फाळणीच्या भीषण हिंसेला साक्षीदार असलेल्या अनेक लेखकांनी (मण्टो, रजा, यशपाल, प्रीतम, गंगोपाध्याय, खुशवंत सिंह), हिंदी-उर्दू-बंगाली साहित्यात हा विचार व्यक्त केला. स्वत: स्थलांतरित झालेल्या, किंवा एकूण स्थलांतर, जागतिकीकरण, गढूळ अस्मिता, इत्यादीत रस असलेल्या “इंडियन इंग्लिश” लेखकांचाही हा आवडता विषय राहिला आहे. मराठी साहित्यात राष्ट्रीयत्वाची अशी मार्मिक, वैश्विक, आणि समानानुभूतिपूर्ण चर्चा मी प्रथमच वाचली, ती देखील १९३९ या काळात, अशा विलक्षण पात्रांतून. ही कादंबरी खरोखर एकाच वेळी cosmopolitan ही, आणि मराठीही आहे असे जाणवले.

एकच गोष्ट सतत खटकली, आणि ती म्हणजे शेवटी शेवटी आलेली पात्रांच्या दृष्टीकोनातली असंबद्धता. संपूर्ण कादंबरी चक्रधरच्या दृष्टीकोनातून आपण वाचतो, पण शेवटी शेवटी एकाएकी हॅर्टाच्या मनात शिरतो – पण अजून चक्रधरच्याच निवेदनात. तो कादंबरीभर स्त्री जातीचा इतका संशयी असताना, एकदम त्याच्या आवाजात तिचे विचार, तिची तळमळ आणि अस्मिता प्रस्तुत केलेल्या मला विसंगत, कादंबरीच्या शिस्तीला सोडून वाटले. हे वळण बेडेकरांनी ठरवून घेतले, की गोष्ट त्यांच्या हातातून थोडीशी निसटली, हे कळणे कठिण. एकूण हे स्त्रीचित्रण मला उमगले नाही – चक्रधरच्या संशयासहित स्त्रियांकडून असलेल्या “धोक्या” पासून जपून राहण्याची काही
अगदी साचेबंद विधाने कादंबरीभर आहेत, पण त्यासोबत सगळी स्त्रीपात्रे या विचाराला मोडही घालत जातात. शेवटी चक्रधरही मावळतो. त्यातून बेडेकरांना नक्की काय म्हणायचे होते हे कळले नाही – पण राष्ट्रीय स्वाभिमानाची, सामाजिक अब्रूची निव्वळ मूर्ती ठरण्यापेक्षा बेडेकरांची स्त्री पात्रे माणुसकी, लैंगिक क्षमता, स्वतंत्र विचारांनी कमालीच्या जीवंत होतात. अर्थात, कादंबरीत एकही भारतीय स्त्री नाही. तशी असती तर तिच्या पात्राची घडण वेगळी झाली असती का, कोण जाणे.

इतकी सुबक, विचारप्रवर्तक, आणि दृढबद्ध मराठी कादंबरी – खासकरून १९३०-४०च्या काळातली – मी तरी वाचली नव्हती. कथानकाची घडण अत्यंत प्रभावी आहे. अगदी नेमके शब्द आणि चित्रदर्शी वर्णन; कुठेही पाल्हाळ नाही. पटकथा लेखकाची शिस्त बेडेकरांनी कादंबरीतही पाळली आहे. मला प्रथम थोडी कृत्रिम वाटली – कोण हे सगळे युरोपियन लोक मराठीत बोलणारे! पण वाचता वाचता एकूण वर्णनशैलीची सहजता छान जाणवली. बोटीच्या प्रवासाचे असो किंवा प्रेमभावनांचे असो, अथवा अगदी पाश्चात्य पद्धतींचे, रीतिरिचाजांचे असो, त्यांच्या वर्णनांतून काहीतरी भलतंच वाचतोय असं वाटलं नाही. मुख्य म्हणजे कादंबरीचे विश्व किंवा पात्रे बघता
इंग्रजी शब्दांचा वापर फारच कमी जाणवला. त्या काळी ही भाषा आणि शैली फारच आधुनिक वाटली असावी का?

असो. आता या पुस्तकाबद्द्ल खूप कुतूहल वाटत आहे.  बेडेकरांचे “एक झाड, दोन पक्षी” हे आत्मचरित्र वाचायची खूप इच्छा आहे, पण पुस्तक सहजासहजी उपलब्ध आहे असे दिसत नाही.

(पूर्वी येथे प्रकाशित.)

Posted in परीक्षण | 1 Comment

“फॅन्टॅस्टिक” फेलूदा – बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ ‘फेलूदा’ची ओळख “शोनार केल्ला” या सिनेमाने झाली. सहा वर्षाचा मुलगा मुकूल धर अचानक एके दिवशी पूर्वजन्माबद्दल बोलू लागतो, आणि दूर राजस्थानातल्या जुन्या लढायांबाबत, उंट, रेत, चमकणारे खडे, सोनेरी किल्ला, अशा अनोळख्या गोष्टींच्या आठवणी सांगतो. एक विख्यात संशोधक मुकूलच्या पुनर्जन्माचा शोध लावण्यास त्याला राजस्थानला घेऊन जातात. पेपरात बातमी येते, आणि मौल्यवान खड्यांचा उल्लेख होतो. यामुळे काही गुंड लोक गुप्तधनाच्या आशेने त्यांच्या मागे लागतात, आणि हिप्नोसिसद्वारा मुकूलकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. फेलूदा आणि त्याचा चुलत भाऊ तोपशे मुकूलच्या संरक्षणासाठी राजस्थानला धावतात, तेव्हा वाटेत त्यांना प्रसिद्ध रहस्य साहसकथालेखक लालमोहन गांगूली उर्फ ‘जटायू’ भेटतात. तिघांची चांगली जमते, आणि मुकूलला चोरांपासून वाचवून ते यशस्वीरित्या कलकत्त्याला परत घेऊन येतात.

का कोण जाणे, मला शोनार केल्लाने वेड लावले. राजस्थानचे चित्रण आणि लोकसंगीत, जटायूंच्या विनोदी भूमिकेत संतोष दत्त, खिन्नपणे किल्ला शोधणारा मुकूल, त्याच्या गतजन्माच्या आठवणींचे गूढ, आणि उंटावरून, रेल्वेतून, टॅक्सीतून खलनायकांचा पाठलाग करणारे दोघे भाऊ. सगळंच सुरसपणे एकत्र आलं होतं. शोले परत परत पहावा तसा मी पंचवीसएक वेळा हा चित्रपट पाहिला असेन. मग गोपा मजुमदार यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या समग्र फेलूदा कथा वाचल्या. अलीकडे, अनेक वर्षांनंतर, अशोक जैन यांनी मराठीत अनुवाद केलेल्या बारा फेलूदा कथांचा संच पहवयास मिळाला. योगायोगाने, तेव्हाच एका नातेवाइकाने बंगाली वाचन सुधारण्याकरिता मला मूळ फेलूदा समग्रचे दोन खंडही भेट म्हणून दिले. याच निमित्ताने, या आवडत्या गुप्तहेराच्या जगाची थोडीशी ओळख.

राय यांनी १९६५-१९९५ या अवधीत एकूण ३५ फेलूदा कथा लिहील्या. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रायचौधरी यांनी बाल-किशोर वाचकांसाठी ‘संदेश’ हे मासिक एकेकाळी काढले होते. आजोबांसारखेच, राय यांचे वडील सुकुमार राय यांचा देखील बंगाली बालसाहित्यात सिंहाचा वाटा आहे – त्यांच्या ‘आबोलताबोल’ कविता शाळकरी मुलांना आजही पाठ असतात. सत्यजीत राय स्वतः दिग्दर्शक म्हणून जगविख्यात आहेत, पण किशोरवाचकांसाठी त्यांनी अनेक सायन्स फिक्शन लघुकथा लिहील्या. १९६१ राय यांनी ‘संदेश’ पुन्हा चालू केले, आणि १९६५ साली याच मासिकात पहिली फेलूदा कथा प्रसिद्ध झाली. ही इतकी लोकप्रिय झाली की पुढच्या वर्षी राय यांनी आणखी एक लिहीली. त्यानंतर कथा जशा लोकप्रिय आणि विस्तृत होत गेल्या, तशीच फेलूदाची व्यक्तीरेखाही जास्त पैलूदार होत गेली.

प्रदोष उर्फ फेलू मित्तिर देखणा, उंच, विशीतला असून, कथांचा निवेदक आणि त्याचा चुलत भाऊ तपेश (उर्फ तोपशे – एखा लहान मास्याचे नाव) त्याहून दहा-बारा वर्षांनी लहान आहे (म्हणूनच फेलू-दा). फेलूदाची स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे, आणि बुद्धीबळ, बंदूक चालवणे, योगासन, क्रिकेट, पत्त्यांचे जादूचे खेळ, दोन्ही हाताने लिहीणे, या सर्वात तरबेज आहे. त्याला वाचनाची आवड आहे, आणि त्यातून सामन्य ज्ञान वाढवण्याची. केसबद्दलचे टिपण तो पुरातन ग्रीक लिपीत करतो. तो अत्यंत धाडसी आणि सत्यनिष्ठ आहे. शर्लॉक होम्स सारखेच तर्कशक्ती आणि निरीक्षणशक्तीद्वारे बारीक सारीक गोष्टींतून, बाबींतून रहस्य उलगडतो. थोडक्यात, तो तोपशेचा हीरो आहेच, पण किशोरवाचकांसाठी तो रोलमॉडेलही आहे. काही ठराविक कोडे त्याच्या समोर नेहमी येतात – मौल्यवान वस्तू अचानक घरातून गायब होणे हे राय यांचे लोकप्रिय रहस्य. सुरुवातीच्या कथांमध्ये तोपशेला रात्री जाग येऊन खिडकीत अनोळखी चेहरा दिसतो; सकाळी “पुढे चौकशी केलीत तर खबरदार!” अशी भीतीदायक चिठी सापडते. पुढल्या कथांमध्ये चोर्‍यांसकट खूनही होऊ लागतात, आणि फक्त धमक्याच नव्हे तर दोघा भावांना मारहाण आणि अपहरणही सहन करावे लागते. फेलूदाला तोपशे लहान-सहान प्रश्न विचारून साहाय्य करतो, तर जटायूंची प्रयत्न करूनही मदत होत नाही. माझ्या सर्वात आवडत्या कथा “देवतेचा शाप” आणि “रॉयल बेंगॉलचे रहस्य” – दोन्हीत राय यांनी रहस्य इतके गुंतागुंतीचे रचले केले आहे, की शेवटपर्यंत सस्पेन्स मस्त टिकून राहतो.

जैन यांनी निवडलेल्या कथांच्या शीर्षकावरूनच त्यांच्या लोकप्रियेतेचा सुगावा लागतो – “गंगटोकमधील गडबड”; “कैलासातील कारस्थान”; “मुंबईचे डाकू”; “काठमांडूतील कर्दनकाळ”… कधी लखनऊ आणि लक्षमणझूला, तर शिमल्याच्या बर्फात गुंडांचा पाठलाग, कधी वेरूळच्या लेणींत साहसी चकमक, तर कधी वाराणसीत गंगातटी तोतया स्वामींचा पर्दाफाश. प्रत्येक कथा वाचकाला एका वेगळ्याच, रम्य पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन जाते. निघण्याआधी फेलूदा त्या ठिकाणावर पुस्तक वाचतो, आणि त्याबद्दल महत्त्वाची आणि रोचक माहिती तोपशेला कळवतो. अर्थात, वाचकांचाही त्यांच्या डोळ्यातून प्रवास घडतो. खासकरून दुर्गा पूजेच्या किंवा नाताळच्या सुटीत तोपशेला फेलूदाबरोबर जाता येते, आणि प्रवासाच्या तयारीत लाँड्रीत ठेवलेले गरम कपडे घेऊन येणे आनंदाचा, महत्त्वाचा भाग असतो. मुंबईला कलकत्त्याहून हिवाळा कमी असतो हे कळल्यावर तोपशेला निराशच वाटले असावे, कारण त्या खेपेला लाँड्रीत जावे लागले नाही हे तो आवर्जून सांगतो. किशोर वाचकाला अंगावर प्रसन्न शहारा साहसपूर्ण वर्णनानेच नाही तर थंडीच्या भासानेही येत असावा असे वाटल्यावाचून राहत नाही.

१९७० साली ‘देश’ या प्रौढ वाचकांच्या मासिकाने पहिली फेलूदा दीर्घकथा छापली, आणि पुढच्या तीन्ही तिथेच प्रसिद्ध झाल्या. किशोर वयाच्या मुलांच्या पालकही फेलूदाच्या कथा आवर्जून वाचत होते, हे सिद्ध झाले. राय यांना या वाचकवर्गाकडून कथा अधिक मसालेदार करण्याबाबत सतत पत्रे येत. पण मोठ्यांना कितीही आवडत असल्यातरी किशोरवाचकांना समोर ठेवून कथांना “स्वच्छ” ठेवणे भाग होते असे ते वारंवार नमूद करत. म्हणून शेवटपर्यंत हिंसा, सनसनाटी वर्णन, प्रेमप्रकरणावरून झालेले खून-गुन्हे इ. त्यांनी कथानकात टाळलेच. या ‘सोज्ज्वळते’च्या इच्छेमुळे, की इंग्रजी ‘ऍड्वेंचर स्टोरीज् फॉर बॉइज्’ कथाप्रकाराचा या गोष्टींवर पडलेल्या छाप मुळे की काय कोण जाणे, पण सुरुवातीच्या अनेक कथांमध्ये मुली-स्त्रियाच नाहीत – लहान मुली नाहीत, पात्रांच्या आया-बायका नाहीत, तोपशेच्या वयाच्या मुली तर नाहीतच. किशोरवयाच्या मुलींना फेलूदा-तोपशेंच्या कथा कशा वाटल्या या बद्दल कुतूहल वाटते. वर, किशोर मुलांसाठी रोल मॉडेल असलेला हा तडफदार फेलूदा, सिगारेट मात्र पानोपानी ओढतो याचे आश्चर्य वाटते!

ऍगथा ख्रिस्टीच्या रहस्यकथांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या संदर्भात त्यांचे “टी-केक् मिस्ट्रीज्” असे वर्णन कुठेतरी वाचल्याचे आठवते. त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली, आणि आजही रहस्यकथा प्रकाराचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. मूळ रहस्याच्या मांडणीबरोबर त्यांच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या पात्रांचा, स्थान-काळ-प्रथांचा परिचितपणा. लंडनहून रेल्वेने जाण्यासारखे छोटेसे सुंदर इंग्लिश गाव, तिरसट जमीनदार, कमी बोलणारा वकील, नको तिथे नाक खुपसणार्‍या म्हातार्‍या, तडफदार तरुणी, जरा जास्तच माहिती पुरवणारे दुकानदार, हिंसक घटनांमध्ये विक्षिप्त आनंद घेणारी मोलकरीण, ही सगळी ओळखीची पात्रे पुन्हा पुन्हा भेटावयास मिळतात. ख्रिस्टी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हेच आहे, की याच परिचित विश्वातून त्यांनी इतक्या विविध रहस्यकथा निर्माण केल्या. नवीन रहस्याचा आस्वाद घेता घेता, वाचक या ओळखीच्या पात्रांच्या पुनर्भेटीचा, त्यांच्या विश्वात काही काळ रमण्याचाही आस्वाद घेतात – एखाद्या ओळखीच्यांकडे चहाबरोबर “टी-केक्” खालल्यासारखे.

फेलूदा कथा सलग वाचून काढल्या की ख्रिस्टींची आठवण होते. फेलूदाची मदत घेणारे बहुतेक लोक बडे, जुने जमीनदार किंवा श्रीमंत मंडळी असतात. त्यांचे मोठमोठे वाडे, बागबगीचे, जुन्या गाड्या, घरभर नोकर-चाकर, भिंतीवर टांगलेले पूर्वाजांची चित्रे, झुंबर – अनेक गोष्टींतून राय यांच्याच ‘जलसाघर’ चित्रपटाचा सेट, किंवा “बीस साल बाद” मधला बंगला डोळ्यांसमोर येतो. यातील अनेक वयस्कर पात्रे थोडीशी विक्षिप्त असतात – त्यांना जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद तरी असतो, किंवा पिढ्यांपिढ्या त्यांच्याकडे मुघलकालीन मौल्यवान वस्तू असतात. हिर्‍यांनी जडलेले तपकिरीचे डबे, पुरातन संस्कृत हस्तलिखिते, दागिने, मूर्त्या… फेलूदा चोरीला गेलेली औरंगझेबची अंगठी शोधून काढतो, गणेशाची मूर्ती, नेपोलियनचे पत्र, टिंतोरेत्तो या इटॅलियन चित्रकाराचे चित्र अशा अनेक संग्रहित वस्तू चोरांपासून वाचवतो. कथांतील एकूण तयार केलेल्या वातावरणावरून जुन्या काळचा समृद्ध, उच्चभ्रू बंगाली वर्ग समोर येतो. अर्थात, तो समृद्धीचा काळ आता राहिला नाही, हेही जाणवते – भल्या मोठ्या घरात बहुतेक खोल्या बंद असतात, वृद्ध मालक एक-दोन नोकरासहित राहतात, मुलं परदेशात असतात. लहान मुलांसाठी लिहीलेल्या या कथांद्वारे राय या गतविश्वाचे, थोडेसे उतरते का होईना, रोचक दर्शन घडवतात. ६०-७०च्या दशकांत गतविश्वाची आठवण असलेला, पण झपाट्याने बदलत चाललेला बंगाली मध्यमवर्ग हा फेलूदाच्या गोष्टींचा वाचकवर्ग. कथा सुरस आहेतच, आणि एखादी कथा आवडण्याचे लाखो कारण असू शकतात. तरीसुद्धा, यातील मोठ्या वाचकांसाठी कथांमधला हा परिचितपणा आणि त्यातून उद्भवणारा कडूगोड आनंददेखील त्यांच्या आकर्षणाचे कारण होते, असे वाटून जाते. एकूण अनोळखी आणि ओळखीचे सुरेख मिश्रण या सरळसोप्या कथांतून राय साधतात.

मला जटायूच्या व्यक्तीरेखेबद्दल कधी कधी वाइट वाटते. ते अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत, पण चुकांनी आणि अतिशयोक्तीने भरलेली विकाऊ पुस्तके लिहीतात. फेलूदांकडून नेहमी बोलणी खातात, म्हणून पुढे पुस्तक छापण्याआधी ते फेलूदा कडून तपासून घेतात. मऊ माणूस, फेलूदांवर निस्सीम भक्ती असलेला. जटायूंचा अडाणी भित्रेपणा, त्यांचे टक्कल, नाजुक शरीरयष्टी, हे सगळे फेलूदाच्या बरोबर उलट तर आहेच. जटायूंचे देखील प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या देशांत, खंडात वसवलेले असते – ‘हाँडूरासातील हाहाकार’, ‘सहार्‍यातला शहारा’, इ. त्यांच्या वर्णनशक्तीद्वारे वाचकांचे पर्यटन घडवायचा त्यांचाही उद्देश्य असतो. त्यांचा कथानायक – प्रखर रुद्र – हा इतका प्रखर असतो की त्यापुढे फेलूदाही अगदीच फिका दिसतो. जटायूंच्या व्यक्तीरेखेद्वारे राय यांना स्वत:चीच हलकी-फुलकी मस्करी करायची होती, का तत्कालीन अन्य बंगाली रहस्यकथाकारांवर कडकडून टीका करावयाची होती हे निश्चित सांगता येत नाही.

जैन यांनी १२ कथांचा मराठी अनुवाद गोपा मजुमदारांच्या इंग्रजी अनुवादावरून केला आहे. मराठीतही कथानकाचा ओघ अगदी सरळ आणि सुरस आहे. मूळ कथेतले रहस्यमय, साहसपूर्ण वातावरण छान उतरले आहे. असे असून सुद्धा, भारतीय भाषांच्या देवाण-घेवाणाला इंग्रजीची वाढती मध्यस्ती चिंतनीय आहे. अनेक साहित्य अकदेमी पुरस्कृत पुस्तके इंग्रजी मार्गे अन्य भारतीय भाषांत येतात. उ. “गारंबीचा बापू” चा बंगाली अनुवादही इयन रेसाइडने केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केला गेला आहे. याचा अनुवादित संहितेत मजकूरच नव्हे तर भाषाशैली, लक्षण, सूर, वाक्प्रचार, इ. कसे बदलतात, हा अभ्यासणाजोगा विषय आहे. मी जैन यांनी अनुवादित केलेल्या सगळ्या मराठी कथा वाचल्या नाहीत. पण एखाददुसर्‍या ठिकाणी मजकूर मराठीत काहीसा मजेशीर आणि कृत्रीम उमटला आहे. मूळ कथानकात बारीक, हलक्याफुलक्या विनोदाचा सूर आहे. बोलीभाषेच्या तुटक-तुटक वाक्यांतून तो उमटतो. मजुमदार यांच्या इंग्रजी रूपात वाक्यांचा हा तुटकपणा नाही, त्यामुळे तो खेळकरपणा थोडा मराठी रूपांतरातही नाहिसा झाला आहे.

पण एकदा वाचायला घेतले, की मराठी वर्शनही खाली ठेववत नाहीच! फेलूदा सारखेच अजून अनेक किशोरवयीन साहित्य आणि रहस्यकथा मराठीत आले पाहिजे अशी उत्कंठा जैन आणि रोहन प्रकाशनने निर्माण केली आहे.

(पूर्वी उपक्रम वर प्रकाशित)

Posted in परीक्षण, बहुभाषिक | Leave a comment