“फॅन्टॅस्टिक” फेलूदा – बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ ‘फेलूदा’ची ओळख “शोनार केल्ला” या सिनेमाने झाली. सहा वर्षाचा मुलगा मुकूल धर अचानक एके दिवशी पूर्वजन्माबद्दल बोलू लागतो, आणि दूर राजस्थानातल्या जुन्या लढायांबाबत, उंट, रेत, चमकणारे खडे, सोनेरी किल्ला, अशा अनोळख्या गोष्टींच्या आठवणी सांगतो. एक विख्यात संशोधक मुकूलच्या पुनर्जन्माचा शोध लावण्यास त्याला राजस्थानला घेऊन जातात. पेपरात बातमी येते, आणि मौल्यवान खड्यांचा उल्लेख होतो. यामुळे काही गुंड लोक गुप्तधनाच्या आशेने त्यांच्या मागे लागतात, आणि हिप्नोसिसद्वारा मुकूलकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. फेलूदा आणि त्याचा चुलत भाऊ तोपशे मुकूलच्या संरक्षणासाठी राजस्थानला धावतात, तेव्हा वाटेत त्यांना प्रसिद्ध रहस्य साहसकथालेखक लालमोहन गांगूली उर्फ ‘जटायू’ भेटतात. तिघांची चांगली जमते, आणि मुकूलला चोरांपासून वाचवून ते यशस्वीरित्या कलकत्त्याला परत घेऊन येतात.

का कोण जाणे, मला शोनार केल्लाने वेड लावले. राजस्थानचे चित्रण आणि लोकसंगीत, जटायूंच्या विनोदी भूमिकेत संतोष दत्त, खिन्नपणे किल्ला शोधणारा मुकूल, त्याच्या गतजन्माच्या आठवणींचे गूढ, आणि उंटावरून, रेल्वेतून, टॅक्सीतून खलनायकांचा पाठलाग करणारे दोघे भाऊ. सगळंच सुरसपणे एकत्र आलं होतं. शोले परत परत पहावा तसा मी पंचवीसएक वेळा हा चित्रपट पाहिला असेन. मग गोपा मजुमदार यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या समग्र फेलूदा कथा वाचल्या. अलीकडे, अनेक वर्षांनंतर, अशोक जैन यांनी मराठीत अनुवाद केलेल्या बारा फेलूदा कथांचा संच पहवयास मिळाला. योगायोगाने, तेव्हाच एका नातेवाइकाने बंगाली वाचन सुधारण्याकरिता मला मूळ फेलूदा समग्रचे दोन खंडही भेट म्हणून दिले. याच निमित्ताने, या आवडत्या गुप्तहेराच्या जगाची थोडीशी ओळख.

राय यांनी १९६५-१९९५ या अवधीत एकूण ३५ फेलूदा कथा लिहील्या. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रायचौधरी यांनी बाल-किशोर वाचकांसाठी ‘संदेश’ हे मासिक एकेकाळी काढले होते. आजोबांसारखेच, राय यांचे वडील सुकुमार राय यांचा देखील बंगाली बालसाहित्यात सिंहाचा वाटा आहे – त्यांच्या ‘आबोलताबोल’ कविता शाळकरी मुलांना आजही पाठ असतात. सत्यजीत राय स्वतः दिग्दर्शक म्हणून जगविख्यात आहेत, पण किशोरवाचकांसाठी त्यांनी अनेक सायन्स फिक्शन लघुकथा लिहील्या. १९६१ राय यांनी ‘संदेश’ पुन्हा चालू केले, आणि १९६५ साली याच मासिकात पहिली फेलूदा कथा प्रसिद्ध झाली. ही इतकी लोकप्रिय झाली की पुढच्या वर्षी राय यांनी आणखी एक लिहीली. त्यानंतर कथा जशा लोकप्रिय आणि विस्तृत होत गेल्या, तशीच फेलूदाची व्यक्तीरेखाही जास्त पैलूदार होत गेली.

प्रदोष उर्फ फेलू मित्तिर देखणा, उंच, विशीतला असून, कथांचा निवेदक आणि त्याचा चुलत भाऊ तपेश (उर्फ तोपशे – एखा लहान मास्याचे नाव) त्याहून दहा-बारा वर्षांनी लहान आहे (म्हणूनच फेलू-दा). फेलूदाची स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे, आणि बुद्धीबळ, बंदूक चालवणे, योगासन, क्रिकेट, पत्त्यांचे जादूचे खेळ, दोन्ही हाताने लिहीणे, या सर्वात तरबेज आहे. त्याला वाचनाची आवड आहे, आणि त्यातून सामन्य ज्ञान वाढवण्याची. केसबद्दलचे टिपण तो पुरातन ग्रीक लिपीत करतो. तो अत्यंत धाडसी आणि सत्यनिष्ठ आहे. शर्लॉक होम्स सारखेच तर्कशक्ती आणि निरीक्षणशक्तीद्वारे बारीक सारीक गोष्टींतून, बाबींतून रहस्य उलगडतो. थोडक्यात, तो तोपशेचा हीरो आहेच, पण किशोरवाचकांसाठी तो रोलमॉडेलही आहे. काही ठराविक कोडे त्याच्या समोर नेहमी येतात – मौल्यवान वस्तू अचानक घरातून गायब होणे हे राय यांचे लोकप्रिय रहस्य. सुरुवातीच्या कथांमध्ये तोपशेला रात्री जाग येऊन खिडकीत अनोळखी चेहरा दिसतो; सकाळी “पुढे चौकशी केलीत तर खबरदार!” अशी भीतीदायक चिठी सापडते. पुढल्या कथांमध्ये चोर्‍यांसकट खूनही होऊ लागतात, आणि फक्त धमक्याच नव्हे तर दोघा भावांना मारहाण आणि अपहरणही सहन करावे लागते. फेलूदाला तोपशे लहान-सहान प्रश्न विचारून साहाय्य करतो, तर जटायूंची प्रयत्न करूनही मदत होत नाही. माझ्या सर्वात आवडत्या कथा “देवतेचा शाप” आणि “रॉयल बेंगॉलचे रहस्य” – दोन्हीत राय यांनी रहस्य इतके गुंतागुंतीचे रचले केले आहे, की शेवटपर्यंत सस्पेन्स मस्त टिकून राहतो.

जैन यांनी निवडलेल्या कथांच्या शीर्षकावरूनच त्यांच्या लोकप्रियेतेचा सुगावा लागतो – “गंगटोकमधील गडबड”; “कैलासातील कारस्थान”; “मुंबईचे डाकू”; “काठमांडूतील कर्दनकाळ”… कधी लखनऊ आणि लक्षमणझूला, तर शिमल्याच्या बर्फात गुंडांचा पाठलाग, कधी वेरूळच्या लेणींत साहसी चकमक, तर कधी वाराणसीत गंगातटी तोतया स्वामींचा पर्दाफाश. प्रत्येक कथा वाचकाला एका वेगळ्याच, रम्य पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन जाते. निघण्याआधी फेलूदा त्या ठिकाणावर पुस्तक वाचतो, आणि त्याबद्दल महत्त्वाची आणि रोचक माहिती तोपशेला कळवतो. अर्थात, वाचकांचाही त्यांच्या डोळ्यातून प्रवास घडतो. खासकरून दुर्गा पूजेच्या किंवा नाताळच्या सुटीत तोपशेला फेलूदाबरोबर जाता येते, आणि प्रवासाच्या तयारीत लाँड्रीत ठेवलेले गरम कपडे घेऊन येणे आनंदाचा, महत्त्वाचा भाग असतो. मुंबईला कलकत्त्याहून हिवाळा कमी असतो हे कळल्यावर तोपशेला निराशच वाटले असावे, कारण त्या खेपेला लाँड्रीत जावे लागले नाही हे तो आवर्जून सांगतो. किशोर वाचकाला अंगावर प्रसन्न शहारा साहसपूर्ण वर्णनानेच नाही तर थंडीच्या भासानेही येत असावा असे वाटल्यावाचून राहत नाही.

१९७० साली ‘देश’ या प्रौढ वाचकांच्या मासिकाने पहिली फेलूदा दीर्घकथा छापली, आणि पुढच्या तीन्ही तिथेच प्रसिद्ध झाल्या. किशोर वयाच्या मुलांच्या पालकही फेलूदाच्या कथा आवर्जून वाचत होते, हे सिद्ध झाले. राय यांना या वाचकवर्गाकडून कथा अधिक मसालेदार करण्याबाबत सतत पत्रे येत. पण मोठ्यांना कितीही आवडत असल्यातरी किशोरवाचकांना समोर ठेवून कथांना “स्वच्छ” ठेवणे भाग होते असे ते वारंवार नमूद करत. म्हणून शेवटपर्यंत हिंसा, सनसनाटी वर्णन, प्रेमप्रकरणावरून झालेले खून-गुन्हे इ. त्यांनी कथानकात टाळलेच. या ‘सोज्ज्वळते’च्या इच्छेमुळे, की इंग्रजी ‘ऍड्वेंचर स्टोरीज् फॉर बॉइज्’ कथाप्रकाराचा या गोष्टींवर पडलेल्या छाप मुळे की काय कोण जाणे, पण सुरुवातीच्या अनेक कथांमध्ये मुली-स्त्रियाच नाहीत – लहान मुली नाहीत, पात्रांच्या आया-बायका नाहीत, तोपशेच्या वयाच्या मुली तर नाहीतच. किशोरवयाच्या मुलींना फेलूदा-तोपशेंच्या कथा कशा वाटल्या या बद्दल कुतूहल वाटते. वर, किशोर मुलांसाठी रोल मॉडेल असलेला हा तडफदार फेलूदा, सिगारेट मात्र पानोपानी ओढतो याचे आश्चर्य वाटते!

ऍगथा ख्रिस्टीच्या रहस्यकथांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या संदर्भात त्यांचे “टी-केक् मिस्ट्रीज्” असे वर्णन कुठेतरी वाचल्याचे आठवते. त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली, आणि आजही रहस्यकथा प्रकाराचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. मूळ रहस्याच्या मांडणीबरोबर त्यांच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या पात्रांचा, स्थान-काळ-प्रथांचा परिचितपणा. लंडनहून रेल्वेने जाण्यासारखे छोटेसे सुंदर इंग्लिश गाव, तिरसट जमीनदार, कमी बोलणारा वकील, नको तिथे नाक खुपसणार्‍या म्हातार्‍या, तडफदार तरुणी, जरा जास्तच माहिती पुरवणारे दुकानदार, हिंसक घटनांमध्ये विक्षिप्त आनंद घेणारी मोलकरीण, ही सगळी ओळखीची पात्रे पुन्हा पुन्हा भेटावयास मिळतात. ख्रिस्टी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हेच आहे, की याच परिचित विश्वातून त्यांनी इतक्या विविध रहस्यकथा निर्माण केल्या. नवीन रहस्याचा आस्वाद घेता घेता, वाचक या ओळखीच्या पात्रांच्या पुनर्भेटीचा, त्यांच्या विश्वात काही काळ रमण्याचाही आस्वाद घेतात – एखाद्या ओळखीच्यांकडे चहाबरोबर “टी-केक्” खालल्यासारखे.

फेलूदा कथा सलग वाचून काढल्या की ख्रिस्टींची आठवण होते. फेलूदाची मदत घेणारे बहुतेक लोक बडे, जुने जमीनदार किंवा श्रीमंत मंडळी असतात. त्यांचे मोठमोठे वाडे, बागबगीचे, जुन्या गाड्या, घरभर नोकर-चाकर, भिंतीवर टांगलेले पूर्वाजांची चित्रे, झुंबर – अनेक गोष्टींतून राय यांच्याच ‘जलसाघर’ चित्रपटाचा सेट, किंवा “बीस साल बाद” मधला बंगला डोळ्यांसमोर येतो. यातील अनेक वयस्कर पात्रे थोडीशी विक्षिप्त असतात – त्यांना जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद तरी असतो, किंवा पिढ्यांपिढ्या त्यांच्याकडे मुघलकालीन मौल्यवान वस्तू असतात. हिर्‍यांनी जडलेले तपकिरीचे डबे, पुरातन संस्कृत हस्तलिखिते, दागिने, मूर्त्या… फेलूदा चोरीला गेलेली औरंगझेबची अंगठी शोधून काढतो, गणेशाची मूर्ती, नेपोलियनचे पत्र, टिंतोरेत्तो या इटॅलियन चित्रकाराचे चित्र अशा अनेक संग्रहित वस्तू चोरांपासून वाचवतो. कथांतील एकूण तयार केलेल्या वातावरणावरून जुन्या काळचा समृद्ध, उच्चभ्रू बंगाली वर्ग समोर येतो. अर्थात, तो समृद्धीचा काळ आता राहिला नाही, हेही जाणवते – भल्या मोठ्या घरात बहुतेक खोल्या बंद असतात, वृद्ध मालक एक-दोन नोकरासहित राहतात, मुलं परदेशात असतात. लहान मुलांसाठी लिहीलेल्या या कथांद्वारे राय या गतविश्वाचे, थोडेसे उतरते का होईना, रोचक दर्शन घडवतात. ६०-७०च्या दशकांत गतविश्वाची आठवण असलेला, पण झपाट्याने बदलत चाललेला बंगाली मध्यमवर्ग हा फेलूदाच्या गोष्टींचा वाचकवर्ग. कथा सुरस आहेतच, आणि एखादी कथा आवडण्याचे लाखो कारण असू शकतात. तरीसुद्धा, यातील मोठ्या वाचकांसाठी कथांमधला हा परिचितपणा आणि त्यातून उद्भवणारा कडूगोड आनंददेखील त्यांच्या आकर्षणाचे कारण होते, असे वाटून जाते. एकूण अनोळखी आणि ओळखीचे सुरेख मिश्रण या सरळसोप्या कथांतून राय साधतात.

मला जटायूच्या व्यक्तीरेखेबद्दल कधी कधी वाइट वाटते. ते अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत, पण चुकांनी आणि अतिशयोक्तीने भरलेली विकाऊ पुस्तके लिहीतात. फेलूदांकडून नेहमी बोलणी खातात, म्हणून पुढे पुस्तक छापण्याआधी ते फेलूदा कडून तपासून घेतात. मऊ माणूस, फेलूदांवर निस्सीम भक्ती असलेला. जटायूंचा अडाणी भित्रेपणा, त्यांचे टक्कल, नाजुक शरीरयष्टी, हे सगळे फेलूदाच्या बरोबर उलट तर आहेच. जटायूंचे देखील प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या देशांत, खंडात वसवलेले असते – ‘हाँडूरासातील हाहाकार’, ‘सहार्‍यातला शहारा’, इ. त्यांच्या वर्णनशक्तीद्वारे वाचकांचे पर्यटन घडवायचा त्यांचाही उद्देश्य असतो. त्यांचा कथानायक – प्रखर रुद्र – हा इतका प्रखर असतो की त्यापुढे फेलूदाही अगदीच फिका दिसतो. जटायूंच्या व्यक्तीरेखेद्वारे राय यांना स्वत:चीच हलकी-फुलकी मस्करी करायची होती, का तत्कालीन अन्य बंगाली रहस्यकथाकारांवर कडकडून टीका करावयाची होती हे निश्चित सांगता येत नाही.

जैन यांनी १२ कथांचा मराठी अनुवाद गोपा मजुमदारांच्या इंग्रजी अनुवादावरून केला आहे. मराठीतही कथानकाचा ओघ अगदी सरळ आणि सुरस आहे. मूळ कथेतले रहस्यमय, साहसपूर्ण वातावरण छान उतरले आहे. असे असून सुद्धा, भारतीय भाषांच्या देवाण-घेवाणाला इंग्रजीची वाढती मध्यस्ती चिंतनीय आहे. अनेक साहित्य अकदेमी पुरस्कृत पुस्तके इंग्रजी मार्गे अन्य भारतीय भाषांत येतात. उ. “गारंबीचा बापू” चा बंगाली अनुवादही इयन रेसाइडने केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केला गेला आहे. याचा अनुवादित संहितेत मजकूरच नव्हे तर भाषाशैली, लक्षण, सूर, वाक्प्रचार, इ. कसे बदलतात, हा अभ्यासणाजोगा विषय आहे. मी जैन यांनी अनुवादित केलेल्या सगळ्या मराठी कथा वाचल्या नाहीत. पण एखाददुसर्‍या ठिकाणी मजकूर मराठीत काहीसा मजेशीर आणि कृत्रीम उमटला आहे. मूळ कथानकात बारीक, हलक्याफुलक्या विनोदाचा सूर आहे. बोलीभाषेच्या तुटक-तुटक वाक्यांतून तो उमटतो. मजुमदार यांच्या इंग्रजी रूपात वाक्यांचा हा तुटकपणा नाही, त्यामुळे तो खेळकरपणा थोडा मराठी रूपांतरातही नाहिसा झाला आहे.

पण एकदा वाचायला घेतले, की मराठी वर्शनही खाली ठेववत नाहीच! फेलूदा सारखेच अजून अनेक किशोरवयीन साहित्य आणि रहस्यकथा मराठीत आले पाहिजे अशी उत्कंठा जैन आणि रोहन प्रकाशनने निर्माण केली आहे.

(पूर्वी उपक्रम वर प्रकाशित)

Advertisements
This entry was posted in परीक्षण, बहुभाषिक. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s